सरेनिटी रिसॉर्ट (Serenity Resort)
- Rituraj
- Oct 30, 2023
- 4 min read
एक गेट टुगेदर : भावनांचा

"अरे हो हो, अगदी जवळ पोचलो आहे गूगल मॅप प्रमाणे.., फक्त तो कदाचित आधीच्या डाव्या वळणाने सगळा घोळ केला असणार. हो हो डाउनलोड केलेला आहे मॅप ... आलोच दहा एक मिनिटात"
किर्रर्र काळोखात धीरज गाडी हळूहळू अंदाज घेऊन चालवत मोबाईलवर बोलत होता. आजूबाजूला गुडुप्प अंधार. फक्त त्याच्या समोर तेवढी त्या गर्द झाडीची कमान त्याच्या कार च्या हेड लाईट मुळे दिसायची. वळणावळणाच्या त्या कोकणच्या रस्त्यावर त्या रात्री गेला एक तास तो भरकटला होता. मोबाईल ची रेंज नाही,अमावास्येची रात्र, अनोळखी प्रदेश, त्यात गूगल मॅप ची गुगली आणि बाहेर रस्ता विचारायला कुत्रा देखील नाही. कुणाच्याही तोंडचे पाणी पळेल अशी शांतता चिरत जाणाऱ्या दोन गोष्टी - रातकिड्यांचा आवाज आणि त्याच्या SUV चा हेड लाईट - जो त्या नागमोडी रस्त्याचा पाठलाग गेला एक तास अथक करत होता. एखाद्याला असं वाटेल हा पाठलाग कधीच संपणार नाही.
त्याचे मित्र रिसॉर्ट वर दुपारीच पोचले होते. धीरजची गाडी घाटात पंचर झाल्याने त्याला आधी तसं न करायचं ठरवूनही कोकणच्या त्या अंधारी अनोळखी प्रदेशात ड्राईव्ह करावे लागत होते. कोणी अन्य जर गाडीत असता तर त्या व्यक्तीला तशा त्या भयाण स्थितीत दिलासा मिळाला असता फक्त एका गोष्ट्टीने - धीरजच्या त्या परिचित धीर गंभीर वृत्तीने.
"आलेSS , होSS ... साहेब आले.. आम्ही तर आशाच सोडून दिली होती तू आज पोचण्याची" त्याला रिसॉर्ट च्या आत गाडी पार्क करताना पाहून उमेद पळत पळत येऊन त्याला मिठी मारत म्हणाला. "ये असा इकडून... ह्या वाटेने"
"बाहेरून काही कल्पनाच येत नाही रे ह्या अशा जंगलात इथे एक असे रिसॉर्ट असेल" त्या रिसॉर्टच्या कल्पक व आजूबाजूच्या वातावरणाला पूरक अश्या कल्पक बांधणीला निहाळत, हॉल मध्य प्रवेश करत धीरज म्हणाला.
धीरज हॉलमध्ये येताच संयम, प्रशांत,आनंदिनी त्याचे स्वागत करायला उठले.
"साल्या आत्ता इतक्या वर्षांनी भेटतो आहेस." प्रशांत म्हणाला.
"अरे तुझ्याबरोबर आशा पण येणार होती ना आनंदिनी?" : धीरज.
"अरे हो तिची आई जरा सिरिअस आहे, पण आत्ताच फोन आला होता तिचा, काळजीचं कारण नाही आता" आनंदिनी उत्तरली.
कॉलेज संपून गेल्यावर त्यांचा हा पंचविसाव्या ऍनिव्हर्सरी चा गेट-टुगेदर हा बेत काही ना काही कारणामुळे अनेक वेळा बारगळला होता. बरेच जण व्हाट्सअँप वर अगदी चिडीचूप असायचे गेट टुगेदर चा विषय निघाल्यावर. फक्त आशा, उमेद, प्रशांत, आनंदिनी, धीरज आणि संयम हे तेवढे उत्साही निघाले. 'कसेही करून भेटायचेच, मग आता कितीही जण जमोत' असे ठरवून शेवटी दीड वर्षांच्या प्लँनिंग नंतर ते आज भेटत होते.
"हमम आशा आली असती तर मस्त झालं असतं यार, पण ठीक आहे...पुन्हा कधी. तिची ती गाणी प्रत्यक्ष ऐकायला जाम मजा आली असती. फार छान टर्न घेतला तिच्या लाईफनी ते सगळं झाल्यावर. प्रत्येकाला आयुष्य कुठं आणून ठेवेल आणि घेऊन जाईल याचा काही नेम SS ... नाहीSS" इति उमेद आता सर्वांसाठी दुसरी बिअर त्यांच्या त्यांच्या ग्लास मध्ये न फेसाळता 'नेम' धरून ओतण्याच्या प्रयत्नात अगदी एकाग्र!
"अरे एवढी एकाग्रता अभ्यासात दाखवली असतीस तर आज इसरो मध्ये काम करत असतास. स्वप्न होतं ना तुझं ते" धीरजचा सहज टोमणा, उमेदला.
उमेद ग्लासेस सर्वांसमोर ठेवत "वक्त से पहले और किस्मत से ज्यादा ... "
"कुठल्या ट्रक च्या मागे अडकला होतास ट्रॅफिक मध्ये ... येताना ?" आनंदिनी उमेदचे वाक्य मधेच तोडत.
ह्या पाचकळ कोटीवर सर्वजण अगदी खळखळून हसले.
हे सर्व अगदी क्वचितच एकमेकांना भेटायचे. एक अगदी विलक्षण व वेगळी गोष्ट म्हणजे हे सगळे जेंव्हा जेंव्हा भेटले त्यानंतर त्यांना जवळजवळ प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या आयुष्यात कठीण प्रसंग आले. त्यांना तोंड देताना ते वैयक्तिकरित्या फक्त ते एकटे नव्हते. म्हणजे तो किंवा ती हे जणू त्या त्या भेटींमधून काहीतरी घेऊन गेले स्वतःबरोबर. ज्यामुळे त्यांची जगण्याची जिद्द, उमेद जणू दसपट झाली, त्या त्या कठीण प्रसंगांना तोड देताना.
आजच्या ह्या भेटीत ते सर्व हे असे वेगवेगळे अनुभव शेअर करत होते.
बाहेरून येणारी गार हवा, गर्द ओल्या झाडीचा गंध घेत ते बोलत होते. सुरुवातीला बेढंग असणारा, बाहेरून येणारा बेडकांचा, रातकिड्यांचा आवाज आता एका लयीत येत होता जसा कि जणू जुगलबंदी चालू आहे.
संयम म्हणाला "मला वाटते कि ... आपण असे एकत्र येतो ना तेव्हा... असं वाटतं कि ह्या आपल्या 'व्हाइब' नी एक वेगळीच शक्ती, दिशा, पॉसिटीव्हिटी मिळाली आहे आयुष्याला" संयमाच्या ह्या बोलण्यावर सर्वानी होकारार्थी मान हलवून "चिअर्स" म्हणत एकच आवाजात दुजोरा दिला.
इतका वेळ शांत बसलेल्या प्रशांतला आनंदिनीने विचारले "अरे तू बोल ना. एक विचारू... कसं सावरलंस स्वतःला त्या सगळ्यातून. सॉरी म्हणजे.. तुला वाईट वाटणार असेल तर सोड."
कोरोनानं प्रशांतचं सगळं कुटुंब मुलांसहित त्याच्याकडून हिरावून घेतलं होतं. आनंदिनीच्या ह्या प्रश्नावर तो शांतपणे हसला, त्यात खेद, निराशा नव्हती. तो म्हणाला "झालं असं कि... अगदी संयम च्या शेरोशायरी च्या भाषेत बोलायचं तर ... रंज से ख़ूगर हुआ इंसाँ तो मिट जाता है रंज ..."
"मुश्किलें मुझ पर पड़ीं इतनी कि आसाँ हो गईं" आनंदिनी, उमेद, धीरज, संयम या सर्वांनी त्याचं वाक्य ... गालिबचाचांचा तो आवडता शेर एका सुरात पूर्ण केला.
आनंदमयी बोलली "खरोखर रंज - म्हणजे दुःख्खाचा अतिरेक झाला तर मग नंतर .. सगळे काही सुकर, सोप्पे, आसाँ वाटायला लागते. आणि मग सहन करणे वगैरे शब्दच नाहीसे होतात मनःकोशातून. आणि राहतो तो स्वीकार, आनंदाने स्वीकार... नकारात्मक नाही. असा स्वीकार ज्यात आशाही असते, नवीन उमेद, शांतता, धैर्य सर्व काही असते ... त्यालाच म्हणतात ना सेरेनिटी ... " रिसॉर्ट मधील हॉल च्या कोपऱ्यातला त्या छोट्या नेमप्लेट कडे पाहात आनंदिनी ते शेवटचं वाक्य म्हणाली.
"ए बाई, आता तू पण त्या बाहेरील विद्वानांना सामील होतेस का तत्त्वज्ञानाच्या चर्चेत!" धीरजने तिचा पाय खेचत मिश्किलीने विचारले. बाहेरील बेडकांचा आवाज आता हळू हळू मंदावत होता.
गप्पा रंगत रंगत पहाटेचे ४:३० कधी झाले कोणालाच कळले नाही.
"चला झोपायला हवं थोडंतरी .. मी कुठल्या खोलीत जाऊ?" प्रशांत म्हणाला.
"रूम नंबर २०२" एक आवाज.
"काहीतरी काय! इथे फक्त ५ रूम्स आहेत. हा कसला नंबर." प्रशांत उत्तरला.
"रूम नंबर २०२" परत तो आवाज.
सर्व जण एकमेकांकडे प्रश्नार्थक अर्थाने पाहतात.
"मिस्टर श्रीकांत पुराणिक, रूम नंबर २०२" तो आवाज परत काही वेळाने.
"हॅलो गुड मॉर्निंग". त्याला नर्स हळूच आवाज देऊन उठवत म्हणते
श्रीकांत डोळे उघडून आता खोलीत डाव्या बाजूला नजर फिरवतो. तो सलाईनचा स्टॅन्ड आणि ती नर्स पाहून त्याला कळून चुकतं आपण कुठे आहोत. दारात डॉक्टर येतात आणि म्हणतात "चला मिस्टर श्रीकांत, झोप झाली ना शांत ? Lets do it. डोन्ट वरी एट ऑल!". डॉक्टर आत येऊन श्रीकांतची पाठ थोपटतात. एका मोठ्या रिस्की ऑपरेशन च्या आधीचा तो दिलासा असतो.
मिस्टर श्रीकांत पुराणिकांना अगोदरच, मागच्या आठवड्यापासूनच कल्पना दिलेली असते के हे गंभीर आणि अगदी जिवावर बेतणारं ऑपरेशन यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी आहे. ती नर्स त्याला लांबलचक पॅसेज मधून व्हीलचेअर वरून घेऊन जाताना एखाद्या विपश्यी सारखा भाव श्रीकांतच्या चेहऱ्यावर झळकू लागतो. त्याला आता परिणामांची भीती, चिंता. .. काही नव्हतं. तो या सर्व गोष्टींच्या पलीकडची अवस्था गाठली होती त्याच्या मनानं. एकदम "सीरीन" वाटत होतं त्याला - त्या रिसॉर्टच्या नावाला साजेल असा तो भाव होता त्याच्या चेहऱ्यावर. होय, ते रिसॉर्ट, ज्यात तो गेली रात्र राहिला होता - अतिपरिचितांबरोबर…ज्यांचा चेहरा आता त्याला स्पष्ट आठवतही नव्हता. फक्त आठवत होता तो संवाद, गप्पा, तो शेवटला शेर... .
ऑपरेशन थेटर च्या बेड वर त्याला पहुडण्यासाठी ती नर्स मदत करताना म्हणाली.
"तुम्ही तर एकदम छान फ्रेश दिसता श्रीकांतजी"बेड वर पडल्यावर जवळच्या स्टॅन्ड वर ऑपेरेशन ची हत्यारं, सामग्री चेक करण्यात मग्न असलेल्या त्या नर्सला श्रीकांतने विचारले "तुमचे नाव काय?"
शांतपणे वळून स्मितहास्य करत ती उत्तरली …
"माझं नाव आशा"
Comments