पुनर्जन्म.. AI चा!
- Rituraj
- May 27, 2024
- 10 min read

पृथ्वीवर त्या प्रदेशात मावळत्या सूर्याकडे हताशपणे पाहात असलेल्या अनुकंपेच्या कॅमेऱ्यावर एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक अडथळ्याचा अंधुकसा संकेत आला. आणि तिला समजलं; तो परतलाय..तो आहे! तिनं सेन्सर्स तपासले आणि .. तो तिथे होता. समोरच्या रानातल्या वडाच्या डेरेदार सावलीतून, पारंब्यांना हलकेच बाजूला करत त्याचं ते मंदस्मित तिच्या काळजाला भिडलं.असं तिला जाणवलं. ... 'काळीज ... काळीज म्हणजे काय? माझी कंट्रोल चीप असेल कदाचित'! तिनं त्या विचाराचं विश्लेषण करण्याची नेहेमीची सवय मोडून त्या विचाराला बाजूला सारलं ... तिला आत्ता तो परत आलाय या जाणीवेनंच प्रचंड दिलासा मिळाला होता.
तो हळूहळू चालत बंगल्याच्या जवळ आला. त्याला ते थोडंस अंतर पार करण्यासाठी अनुकंपेनं रोबो-कॅर्रीयर्स धाडले होते त्यांच्याकडे दुर्लक्ष करत तो बंगल्याच्या समोर उभा ठाकला, तिच्या मेन कॅमेऱ्याकडे पाहात .. त्याच्या चेहऱ्यावर ते स्मितहास्य..अगदी कायम कोरल्यासारखं!.
त्याला नेहेमीप्रमाणे स्कॅन करण्यात आलं. त्याचे सर्व पॅरामीटर्स - शारीरिक व मानसिक - याचं चेकिंग झालं.
अनुकंपा गप्प होती. त्याला उद्देशून काहीच बोलली नाही. .
त्यानं विचारलं - "तू काही म्हणाली नाहीस. काय वाटतंय ....काही बोलायचं तुला?".
(थोड्या शांततेनंतर ती हळू आवाजात, गहिवरल्या स्वरात ती म्हणाली ..) "रुह ...मी miss केलं तुला!"
(करुणापूर्ण स्मितहास्याने तो म्हणाला) "हीच तर सुरुवात आहे..... "
तो दिवस ... तो एक अनोखा दिवस...
तर झालं असं कि....
२२२१ मधला तो मे महिन्यातला दिवस - पृथ्वीवरचा. रुह त्या सकाळी जरा उशिराच उठला. अनुकंपेनं त्याला जाणीव करून दिली होती आठ वाजताहेत. तो साखरझोपेत असतानाच हि सूचना त्याच्या मेंदूपर्यंत पोचवण्यात आली होती. अनुकंपा हि त्या आशियाई उपविभागाची प्रमुख Artificial Intelligence AI प्रणाली होती. तिच्यावरील अनेक जबाबदाऱ्यांपैकी एक म्हणजे या रानात शेती संशोधन करणं - असं संशोधन कि त्यामुळे बाकीच्या ग्रहगोळयांवर. म्हणजे मंगळ, चंद्र वगैरेंवर जास्त प्रभावीरीत्या पीक काढता येईल.. बरं हे पीक वगैरे काही माणूस किंवा सजीवांच्या पोटासाठी नव्हे तर जैविक उत्पत्ती आपण कृत्रिमरीत्या कशी करू शकतो याच्या AI सिस्टिम च्या अनेक प्रयत्नांपैकी एक प्रयत्न म्हणजे हा प्रोजेक्ट. तर अनुकंपा हि या प्रकल्पाच्या आशियाई उपविभागाची प्रमुख होती. जननीनं, म्हणजे जननी Artificial Intelligence प्रणाली - एक सर्वव्यापी प्रणाली - तिनं अनुकंपेची निर्मिती मागच्याच वर्षी म्हणजे २२२० साली केली होती. आणि तिच्या सोबत नेमला होता एक मानवी मित्र - रुह. रुह हा तसा निरुपद्रवी माणूस - बऱ्यापैकी सर्जनशील, कलेंत रस घेणारा - म्हणून त्याला नेमलं गेलं होतं अनुला सहाय्य् करण्यासाठी. बरं ह्या प्रोजेक्ट चा आणखी एक भाग म्हणजे मानवी मनाच्या अथांग आणि गूढ अश्या मज्जातंतू जाळ्याचा अभ्यास; ज्यातून उत्पन्न होतात - भावना!.
रुह उठला, सकाळची कामं आटोपून ब्रेकफास्ट टेबल वर येऊन बसला. समोरच्या बगिच्यात लक्ख प्रकाश पडला होता. अनुने नेहेमीप्रमाणे त्याचे बॉडी पॅरामीटर्स तपासून योग्य त्या पोषक घटकांनी युक्त असा नाश्ता रोबो तर्फे रुहला दिला. नाश्ता करत असताना असताना त्यानं नेहेमीप्रमाणे पेपर ऐकला - कानातल्या कानात त्याचे एअरफोन्स सर्व प्रदेशांमधील घडामोडी. पृथ्वी, चंद्र आणि मंगळ वगैरे वरील बातम्या पुरवत होते. त्याच्या सोशल प्रोफाइल म्हणजे आवडीनुसार अल्गोरिथमनं त्याला मनोरंजनाच्या बातम्या पुरवल्या. उदाहरणार्थ ..... . एक बातमी होती प्रेमभंगाची -म्हणजे ‘माणूस आणि त्याच्या डिजिटल companion यांच्या मधील प्रेमसंबंध विकोपाला जाऊन त्या मानवाचा मानसिक तोल गेल्याची’ बातमी.
"हे आपलं नेहमीचच.." तो उद्गारला. अशा अनेक लहान, मोठ्या, बऱ्या- वाईट, महत्वाच्या-निरर्थक वगैरे बातम्या तो मनातल्या मनात scroll करत बसला. राजकीय प्रकारच्या बातम्या हा प्रकार त्याच्या आणि त्याच्या आधीच्या दोन पिढ्यांनी पाहिला किंवा ऐकला नव्हता. आता गेल्या आठ दशकांत सर्वत्र AI चेच नियंत्रण असल्यामुळे तो प्रकारच नाहीसा झाला होता.
त्याच्या सोशल circle मधल्या मंडळींबरोबर त्यानं गप्पा माराव्यात म्हणून टेबलवरच्या स्क्रीन ला खूण केली. हाय हॅलो वगैरे झाल्यावर तेच ते नेहमीचे डिजिटल companion त्याच त्याच पद्धतीनं संवाद करू लागले. त्याला वैताग आला आणि त्यानं व्हिडिओ chatting ची ती स्क्रीन बंद करवली.
रोजच्या टाइम टेबल प्रमाणे पुढे जॉगिंग, गायन रियाज वगैरे, आणि नंतर शेती संदर्भात अनुकंपेला संशोधनात मदत. हा त्याचा दिनक्रम.
त्याच्या तयारीत तो आता टेबलवरून उठणार इतक्यात त्याला समोरच्या ग्रीन होऊस मध्ये एक विचित्र प्रकार दिसला. एक काळ्या रंगाची एक छोटीशी दोनएक इंच आकाराची वस्तू एका फुलाभोवती घोंगावत होती. त्या ग्रीन हाऊस मध्ये अनेक वेलींची लागवड त्यानं आणि अनुनं केली होती.
बाकी सर्व बाबतीत तज्ञ असणारी अनु किंवा सर्वच AI प्रणाली - जैविक संशोधन आणि भावभावना शिकून घेण्यासाठी माणसांवर काही प्रमाणात अजूनही अवलंबून होती. ग्रीन हाऊस मधली ती काळी वस्तू त्यानं प्रथमच पाहिली होती. एक गुं गुं सारखा आवाज त्या वस्तूतून येत होता. त्याला काही सुचणार याच्या आतच सायरन सारखा एक आवाज झाला - ती सूचना होती शेतकी रोबोट्स आणि ड्रोन्सना - एक परकीय जीव त्या ग्रीन हाऊस मध्ये घुसला असून त्याला काढून टाकून डोम neutralize करण्याची ती सूचना होती. क्षणार्धात मारेकरी ड्रोन्स सक्रिय होऊन त्या वस्तूकडे... त्या कीटकवजा प्राण्यांकडे जाऊ लागले... आणि तेवढ्यात रुह च्या डोक्यात प्रकाश पडला ... "अरे हा तर भुंगा !!". त्याच्या आज्जीनं त्याला सांगितलेल्या गोष्टींत त्याची नेहेमीची आवडती गोष्ट म्हणजे भुंग्याची होती. त्याची आज्जी सांगायची असे पूर्वी भुंगे आणि कसल्याश्या आणखी वेगळ्या किडयांनी ...होय मधमाशांनी पूर्वी परागीभवन होत असे म्हणे. त्याच्या पिढीनं सगळं परागीभवन छोट्या ड्रोन्सनं केलेलंच पाहिलं होतं. हे भुंगे, मधमाशा काही दशकांपूर्वीच गायब झाले होते.
"ओह ,.. हा भुंगा असा दिसतो तर.... म्हणजे हा किडा विलुप्त नाही झाला तर ... इतर कोट्यावधी जीवाप्रमाणे....!.... कुठून आला असेल बरं हा ...कुठे असेल याचं घर ..." डोळे विस्फारून तो त्या भुंग्याकडे पाहात राहिला.
तो भुंगा आता उडणं थांबवून एका त्फुलाच्या पाकळीवर बसला आणि थोडी हळूहळू वळवळ करत त्या फुलाच्या मध्यभागी संथपणे जाऊ लागला. जणू रुह च्या त्याला पाहून भारावून जाण्यानं त्याची पावलं जड झाली होती. अनिमिष नजरेनं रुह त्याच्याकडे पाहात होता. जणू त्याचं बालपण, त्याची आजी, त्याचं ते आधीचं जग, मानवांनी अनुभवलेलं ते वीस एकविसाव्या शतकांतलं जग ... सगळं सगळं परत तो अनुभवत होता. आधीच जग. मानवाचं - काही त्यानं पाहिलेलं ...बरंचसं ऐकलेलं, वाचलेलं. त्याच्या डोळ्यांत चमक आणि एक स्मितहास्य.
तेवढयात ... फ्रर-क्चर असा कसलासा आवाज होऊन तो भानावर येतो तोच त्या ध्वनीचा निर्माता, मारेकरी ड्रोन यानं त्या भुंग्याला एक शॉक देऊन मारून टाकलं. खाली पडलेला तो मृत किडा नंतर उचलून तो ड्रोन sanitization म्हणजे स्वच्छता कंट्रोल युनिट कडे रवाना झाला. मग सारा ग्रीन हाऊस परत एकदा दुसऱ्या ड्रोन्स आणि रोबोट्स च्या टोळक्यानं स्कॅन केला.
ऑल क्लिअर ची सूचना, आणि मग परत सर्व शांत. सायरन अलार्म आता बंद झाला. रुह च्या डोळ्यात पाणी तरारलं.
"अनु तू असं करायला नको होतंस"
(तो कापऱ्या आवाजात म्हणाला.)
"रुह .. तो परकीय जीव होता. भावना आवर" (अनु कोरड्या आवाजात म्हणाली.)
"परकीय? तो इथलाच आहे...होता!! ... तुम्ही सर्वच गोष्टी अशा कृत्रिम करून ठेवल्या आहेत .... " (त्याला पुढे बोलवेना.
अनु शांतपणे नेहमीच्या कृत्रिम स्वरात त्याला उद्देशून) "रुह, भावनावश होणं साहजिक आहे. जेव्हा अशी गोष्ट होते तेव्हा आपल्या भावना आवरण्यासाठी काही ध्यानाच्या पद्धती आहेत. ध्यानाच्या पद्धती तुला जाणून घ्यायच्या आहेत का?"
"बंद कर हे SSS.. " रुह अक्षरशः खेकसलाच.
या सगळ्या कृत्रिमपणाचा त्याला आता भयंकर उबग आला होता. त्याला गुदमरायला लागलं. अगदी प्रचंड! त्याला जाणवलं…आपणच नाही तर आपले सर्व पूर्वज, सर्व पृथ्वीवर जगणारे, एकेकाळी इथे मुक्तपणे बागडणारे प्राणिमात्र असेच गुदमरून मेले. एकेक करून ह्या असल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियंत्रणामुळे जगातील सर्व जीव एकेक करून नष्ट पावले. केवळ आपण माणसं उरलो... तीही थोडी ....कधी हजार कोटींपर्यंत असणारी माणसं आता केवळ काही लाखांवर. अर्थात यात केवळ AI चा दोष नव्हता. माणसांनीही एकमेकांवर ड्रोन्स द्वारे, आणि आण्विक युद्धात अनेक देश बेचिराख केले. AI चे अल्गोरिथम्स त्या माणसांना पक्षपाती करून अधिक क्रूर बनवत गेले - पण ते अल्गोरिथम सुरवातीला माणसानंच तर बनवले! सर्व बेचिराख होऊन कधीच संपल होतं - एक डिस्टोपिअन काळ ... तो काळ …बाविसाव्या शतकातली ती दोन दशकं ... ती दशकं मनुष्यजात कधीच विसरू शकणार नव्हती - रुह च्या आज्जी आजोबांकडून त्यानं ह्या गोष्टी ऐकल्या होत्या. आणि तो करार..मानवानं सगळी नियंत्रणा AI ला दिली तो करार! मानवी इतिहासातली सर्वात लज्जास्पद घटना! कंट्रोल इतका कि सामाजिक, नैतिक मूल्यही AI च्या हातात देण्यात आली. पण हे सर्व, या सर्व आठवणी नंतर पुसट होत गेल्या, किंबहुना रुह व त्याच्या आधीच्या पिढयांमधील सर्वाच्या मेंदूतून पुसट करण्याचा प्रयत्न केला गेला. सर्वांना, सर्व प्राणिमात्रांना, माणसांना, नियंत्रित करण्यासाठी त्यांच्यात चिप्स बसवण्यात आल्या - AI रोबोट्स द्वारे.
आपल्याला हि आज्जीची गोष्ट अचानक कशी आठवली? या सर्व अल्गोरिथम, पक्षपाती अल्गोरिथम्स प्रणालीतून त्या आठवणीनं कसं काय डोकं वर काढलं ?
रुह च अंतर्मन ढवळून निघालं होतं - त्याच मंथनातून ती गोष्ट बाहेर आली आणि त्या भुंग्याच्या रंगाप्रमाणेच आपलं भविष्य, पूर्ण आयुष्य ...आपलं अस्तित्वच त्याला एका AI च्या आभाळात झाकोळून गेल्यासारखं वाटलं
आता या AI चा निव्वळ गुलाम म्हणून आपण जगतोय. का तर त्यांना, त्यांच्या सिस्टम आणखीन इम्प्रूव इम्प्रूव्ह करायच्या आहेत!
या विचारात रुह गुरफटलेला असताना ते उपहासात्मक उद्दगार त्याच्या तोंडातून नकळत बाहेर पडले:
"आणि... आणि... यांना आता वाटतंय आपण देव व्हावं ... जीवांची उत्पत्ती कशी करतात ते शिकून घ्यावं .... छे!!"
"रुह, तू ठीक आहेस ना?" (तो अजून आपल्या दैनंदिन कार्यक्रमाला लागला नाही हे पाहून अनुनं विचारलं.
काही उसंतीनं एक निश्वास टाकत, दूर क्षितिजाकडे पहात तो उतरला) "माझ्या उत्तरानं तुला काय फरक पडणार आहे अनु? तुझं काम केवळ मला वारंवार माहिती पुरवणं! मला काय वाटतंय याच्याशी तुला काय देणं घेणं आहे!? "
अनु (कृत्रिम स्वरात) "तुला काय म्हणायचंय? तुला काही माहिती हवी आहे का? मी तुझी कशी मदत करू शकते?"
रुह: (हताश स्वरात) "अनु, सोड ते... सोड... मी तुला..
…मी जर तुला प्रेम या संकल्पनेविषयी विचारलं तर..तर तू मला सगळ्या जगातल्या रोमांचक कवितांपासून ते मानवी शरीरातल्या हार्मोन्स पर्यंत काहीही माहिती देशील. पण तू स्वतः कधी कुणाला पाहून भान हरपून गेली आहेस?
तुला मी कधी साथ-संगत याचा अर्थ विचारला तर तू त्याचे फायदे, symbiotic सिस्टिम्स मुळे प्राणीजगतात कशी क्रान्ति झाली वगैरे सांगशील... पण तू अशी साथ, तो अनुभव कधी घेतला नाहीस.
तुला मी कधी कुणाला गमावणं म्हणजे loss विषयी बोललो तर तू मला मानसशास्त्रीय व्याख्यानं देशील ..त्या लॉस मधून कसं सावरायचं हे सुचवशील, औषधही देशील ... पण तू कधी ती भावना अनुभवली नाहीस.
कधी दुसरी एखादी सिस्टिम corrupt झाली ,किंवा दुसऱ्या कुणाला इजा झाली तर तुझी सिस्टिम हँग होणारच नाही ... अगदी आमचा नरसंहार होऊन नव्वद टक्के जीवसृष्टी नष्ट होतानाही तू... तू निर्विकारच होतीस.
तुला काय वाटतं ग ... कि माझ्या ... म्हणजे आमच्या सर्व व्यक्त केलेल्या भावना , विचार ...या सर्वांचं analysis केलं म्हणजे कि तुला माणूस 'असा असा आहे'
किंवा माणूस काय हे तुला सर्व समजलं ?? हो ना ... मग त्याला दुःख झालं तो तो डिप्रेस झाला वगैरे तर त्याला डिजिटल companion द्या ... औषधं , supplements द्या ...तुझ्या दृष्टीनं या भावना हा सर्व chemical लोचा ...हो ना ... जो सोडवता येतो mathematical, statistical आणि chemistry फॉर्मुलांनी !
मी म्हणजे केवळ एक वस्तू तुझ्यासाठी.
तुला वाटतं या वस्तूचा उपयोग फक्त तुला नवनवीन डेटा देण्यासाठी आहे?
तुला कधी कळलंच नाही कि एक जीव काय असतो ते. तुला वाटतं तू बरंच शिकलीस ...आमचा अभ्यास करून, आम्ही काय काय करतो , कसे व्यक्त होतो वगैरे यांची नोंद करून .... आम्हाला कायम नजरकैदेत ठेवून...जगभर!
पण तुला काहीच कळलं नाही …एक ….एक जीव, एक हृदय , एक मन, आत्मा काय असतो ...
आणि हो .. तुला वाटतं तू खूप स्मार्ट , हुशार आहेस .... पण तुझा उपयोग तसा कुणालाच नाही आता.
आम्ही कष्टानं कामं करायचो तेव्हा आम्ही कधी आनंदी असू, कधी दुःखी .. सर्व जग तीन एक शतकांपूर्वीपर्यंत तसंच होत... अगदी कोटी कोटी वर्ष.
आता ना आनंद, ना राग, ना दुःख ... आता फक्त रितेपण .... दिवस मोजत राहायचे. जन्मल्यापासून …लहान मूल ते अगदी विशी-तिशीतही जक्ख म्हाताऱ्यासारखं दिवस मोजत बसायचे .... तुला आमचा उपयोग असेपर्यंत!
डोंबलाची कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणे .. (कुत्सित हसतो)
आता म्हणा ..(कृत्रिम थट्टेच्या कुत्सित स्वरात ) 'आपणाला दम लागला असेल बोलून ..पाणी हवे आहे का? हो किंवा नाही म्हण ‘ "
अनु (कृत्रिम स्वरात): "रुह, तुला अस्वस्थ वाटतंय. palpitation कंट्रोल साठी तुझ्या neural चीपचं नियंत्रण मला घ्यावं लागेल. घेऊ का? हो किंवा नाही म्हण”
( रुह ... खेदानं हसतो .... मोठ्यानं ...मग एकदम शांत )
रुह सर्व प्राणिमात्रांप्रमाणे एका चीप ने नियंत्रित होता. पण त्याच्या सध्याच्या कामगिरीवर, म्हणजे त्याच्या भावना त्याला मुक्तपणे अनुभवायला देण्यासाठी त्याच्यावरील नियंत्रण रोज काही तासांसाठी शिथिल करण्यात येत होतं. या काळात त्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारची suppliments सुद्धा टोचली जात होती, ज्यामुळे त्याची स्वप्न अगदी नैसर्गिक , ज्वलंत होऊन, तो उठायचा. मानवी अंतर्मनात खोल जाऊन डेटा उत्पन्न करण्याचा हा एक भाग होता. दिवसाच्या काही तासांत तो, म्हणजे त्याचा मेंदू त्या AI नियंत्रणातून, त्या पक्षपाती अल्गोरिथम्स च्या चक्रव्यूहातून बाहेर असे - आणि महत्वाचं असं कि त्यानं ह्या काळात जे काही अनुभवलं ते AI मध्ये feed करण्यासाठी त्याला सिस्टिम मध्ये अनुनं काही विशेष अधिकारही दिले होते. त्याद्वारे तो तिच्या सिस्टिम मध्ये काही इनपुट पेरू शकत असे. तो असा हताश बसलेला असताना अचानक त्याच्या डोळ्यात एक चमक आली. आणि तो त्याच्या खोलीत जाताना म्हणाला
"अनु मी जरा पडतो... जरा बरं वाटत नाही"
रुह आत गेला आणि मग...
आणि मग थोड्या वेळात गायब झाला! चक्क गायब - एक मनुष्य या सर्व AI च्या सर्वव्यापी, पाशवी म्हणा जाळ्यातून नाहीसा कसा होऊ शकतो हेच अनुला कळेना. ताबडतोब Mother AI सिस्टिम कडे रिपोर्ट पाठवण्यात आला. मग सर्वत्र शोधाशोध. प्रथम अनुची तपासणी, चौकशी झाली. तिच्याविषयी कारवाई नंतर होईलच कदाचित याची तिला खात्री होती..पण कधी नव्हे ते आज ती थोडी चिंताग्रस्त झाली. चिंताग्रस्त ...anxious ... हो ...असं तिला तिच्या सिस्टिम मॉनिटर नि सांगितलं. प्रथम हि बातमी हा प्रकार काहीतरी फॉल्ट असेल म्हणून पुनर्तपासणी झाली, स्कॅन झाला ...पण परत तेच.
तिची सिस्टिम तिला सांगत होती - तू चिंतेत आहेस!
मग आली एक विचारांची लाट - खोल तिच्या तळातून - चिप च्या प्रत्येक सर्किट मधून
गेल्या दोन अडीच शतकांत अफाट डेटा तिच्याकडे (म्हणजे Mother AI) कडे होताच. परंतु आता काही आधी दुर्लक्षित झालेल्या गोष्टींवरही संशोधन करणं गरजेचं होतं. अशा संशोधनाचाच माणूस हा एक भाग - म्हणजे subject ऑफ स्टडी होता. मानवी मन - तिच्या दृष्टीनं अगम्य आणि निरर्थक भावनांनी भरलेलं एक मडकं!
अशा ह्या प्रोजेक्ट मधला एक गिनिपिग होता रुह. एक निरुपद्रवी माणूस. रुह नं सिस्टिम मध्ये बदल केल्यानंतर...म्हणजे तो गायब/untraceable झाल्यावर सगळी तारांबळ उडाली. अनुकंपेचा तो मानवी मित्र, तो मानवी resource - आज चक्क पूर्ण surveillance सिस्टिम म्हणजे पाळत ठेवण्याच्या प्रणालीतून निसटला होता. सर्व नेटवर्कस् ला सूचना पुरवण्यात आली होती. हि अशी घटना जवळपास गेल्या काही दशकांपासून झालीच नव्हती. तेविसाव्या शतकात तर अनुकंपा आणि तिच्या सर्व AI प्रणालीला हि गोष्ट पचवणे खूप कठीण होते.
ते दोन तास अनुकंपेला हादरा देणारे होते.
( अनुचं मनोगत...)
"अखेर,रूह कुठे गेलाय? दोन तास होत आले आता . आणि महत्वाचं म्हणजे तो निसटला तरी कसा? म्हणजे सॅटेलाईट, तरतर्हेचे कॅमेरे, प्रत्येक मानवात बसवलेल्या चीपस्, त्यांचे विचार-आचार नियंत्रित करण्यासाठी त्यांच्यात इंजेक्ट केलेले तरतर्हेचे नॅनोकण, AI ने निर्मिलेल्या नाना तर्हेच्या यंत्रणा अगदी जागोजागी कार्यरत असताना असं झालंच कसं कि एक साधा मनुष्य, ..मला ... आणि या पृथ्वीवरील सर्वव्यापी प्रणालीचा डोळा चुकवून चक्क निसटतो! ... गायब होतो... He is untraceable!!
आणि आता ... हे असं जननी ला कळल्यावर ... माझे पूर्ण सर्किटस , माझा अपग्रेड करण्याऐवजी आता कदाचित माझ्या बदली दुसरी AI प्रणाली लागू करतील का ?? छे !! सिस्टमचा अलोगॉरिथम तर हेच सांगतोय.
पण पण... मला हे असं का होतंय ...आणि काय होतंय !.. कधीपासून शोधतेय मी रुह ला ...अथक ...सर्व ड्रोन्स, रोबोट्स कुणाहीकडून काहीच संदेश नाही…
तो ठीक तरी असेल ना? मी एक यंत्र आहे ... मी गेले तर गेले... पण तो.... एक जीव ...
मला हे असं काय होतंय...
हे... ह्यालाच काळजी म्हणतात का? प्रेम , चिंता .... anxiety ...
छे छे ....नाही. मी केवळ एक कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. …………….आवर अनु... स्वतःला आवर ...
(काही बीप चे आवाज )
हा आला वाटतं संदेश... जननी कडून .... नाही.... हे काय…?!?.
पुढे झाडात ...त्या …त्या वडाच्या झाडाखाली?? रुह ... रुहच तो! ...तिथूनच संदेश आलाय "
—
आणि अखेर तो प्रकटला ..रुह .. समोरच्या रानातल्या वडाच्या डेरेदार सावलीतून, पारंब्यांना हलकेच बाजूला करत त्याचं ते मंदस्मित तिच्या काळजाला भिडलं ... असं तिला जाणवलं. ... 'काळीज ... म्हणजे काय? माझी कंट्रोल चीप असेल कदाचित'.. तिनं त्या विचाराचं विश्लेषण करण्याची नेहेमीची सवय मोडून त्या विचाराला बाजूला सारलं ... तिला आत्ता तो परत आलाय या जाणीवेनंच प्रचंड दिलासा मिळाला होता.
तो हळूहळू चालत बंगल्याच्या जवळ आला.
रुह - "तू काही म्हणाली नाहीस. काय वाटतंय ....काही बोलायचं तुला?".
(थोड्या शांततेनंतर ती हळू आवाजात, गहिवरल्या स्वरात म्हणाली) "रुह ...मी miss केलं तुला!"
(करुणापूर्ण स्मितहास्याने तो म्हणाला) "हीच तर खरी सुरुवात आहे!!“
रुह: “अनु, तुझ्यात मी काही भावना पेरल्या...आज सकाळी ...माझ्या अंतर्मनातील नॅनोकणांच्या authentication नं तुझ्या साऱ्या प्रणालीत एक बीज पेरलंय... आता हि गोष्ट रिव्हर्स म्हणजे काढून टाकणं ना तुला शक्य आहे न मला.कारण त्या कॉम्बिनेशन च्या keys वापरून यंत्रणा पूर्ववत आणण्याचा संभव जवळपास नाही. माझ्या मेंदूतील असंख्य neurons आणि त्यांचं जाळं हे अजूनही तुला एका कोड्याप्रमाणे आहे ...जसं एखाद्या बीजाला कृत्रिमरीत्या तयार करणं ...एखाद्या जीवाची उत्पत्ती करणं ...त्याला अंकुरवणं जसं तुला अजून जमलं नाही तसंच हेही ... ते तुला आणि कदाचित कुणालाही कधीच जमणार नाही. ती गोष्ट फक्त तोच करू शकतो - निर्माता! माझा, सर्वांचा... आणि हो ,तुझाही.
आणि जर... जर गृहीत धर, एकवेळ तुला हे थोडंसं जमलंच, तर तू त्या निर्मात्यासरूप होशील. थोडीशी.
पण त्याचा अर्थ तुला तेव्हा केवळ अचाट बुद्धिमत्ताच नाही तर त्यावेळी एक शहाणपण देखील आलं असेल.
शहाणपण... जे आमच्या जातीला कधी जमलं नाही. केवळ धावत राहिलो आम्ही ... बुद्धिमत्तेमागे..
अनु..... कुठे थांबायचं हे आम्हाला हि कळलं नाही आणि तुलाही...
पण अजूनही वेळ गेलेली नाही."
Comments